महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता वार्षिक १२ हजारांचा सन्माननिधी मिळणार, अर्थमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
Maharashtra Budget Session 2023: केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजना या योजनेत आणखी सहा हजार रुपयांची भर राज्य सरकार घालणार असून त्यामुळे शतकऱ्यांना वर्षाकाठी १२ हजार मिळणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुंबई : ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर नव्याने आलेल्या शिंदे फडणवीस सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. केंद्र सरकारने अमृतकाल बजेट सादर केल्यानंतर अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प 'पंचामृत' ध्येयावर आधारित असल्याचं अर्थमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास या 'पंचामृतावर' आजचं बजेट असल्याचं अर्थमंत्री फडणवीसांनी सांगितलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडला.
महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता वार्षिक १२ हजारांचा सन्माननिधी मिळणार
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी ६ हजारांच्या निधीत आणखी ६ हजारांची भर टाकण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार आहेत. याचा फायदा १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

0 टिप्पण्या